
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ३७ लाख रुपयांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरीला गेली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही कंपनी बंद होती. मंगळवारी सायंकाळी गोदामाच्या पाहणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जगदीशकुमार देवराव पारुळकर (वय ४९, रा. रायपूर, छत्तीसगड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही चोरी १६ ते १७ जुलै दरम्यान झाली असावी. पारुळकर यांनी मंगळवारी सायंकाळी गोदामाची तपासणी केली असता, तेथे ठेवलेली महागडी यंत्रसामग्री गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गोदामातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीची घटना समोर आली. एका मोठ्या औद्योगिक युनिटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने औद्योगिक क्षेत्रात चर्चा सुरू आहे. प्राथमिक तपासात, ही चोरी करणाऱ्या व्यक्तींना गोदामाची रचना आणि तेथील यंत्रसामग्रीची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बुधवारी नांदगावपेठ पोलीस आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांचीही नांदगाव पेठ पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. दोन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, अद्याप पोलिसांना त्यांच्याकडून ठोस माहिती मिळालेली नाही. चोरट्यांनी गोदामातून सुमारे १० लाख रुपये किमतीच्या नऊ सर्क्युलर फिटिंग मशिन्स, १० लाख रुपयांची एक सेंटेक्स ड्रायर मशीन, प्रत्येकी पाच लाख रुपयांचे एक लाफेर संगणक संच, एक बेन्को संगणक संच, एक ईव्हीए स्ट्रेंगर मशीन तसेच दोन लाख रुपयांची एक ग्रे ओपनिंग मशीन असा एकूण ३७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही कंपनी निर्मल उज्ज्वल समूहाने मागील वर्षी विकत घेतली होती, परंतु काही कालावधीतच ती बंद पडली. सध्या निर्मल उज्ज्वल को-ऑप सोसायटीवर ठेवीदारांची ओरड सुरू असतानाच ही चोरीची घटना घडली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/