
मुंबईतील जोगेश्वरी भागात मध्यरात्री एका मद्यधुंद टँकरचालकाने दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या चालकाला स्थानिक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अजित ग्लास गार्डन परिसरात अपघात या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव हर्ष असे असून, तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. हर्ष त्याच्या दुचाकीवरून जोगेश्वरी पश्चिमेकडील अमृत नगर परिसरातील ‘अजित ग्लास गार्डन’ गेटसमोरून जात होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या एका भरधाव टँकरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, हर्षचा जागीच मृत्यू झाला. पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडले अपघात झाल्यानंतर जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी टँकरचालकाने वाहनासह तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी त्या परिसरात उपस्थित असलेल्या जागरूक नागरिकांनी तत्काळ प्रसंगावधान राखले. त्यांनी पळणाऱ्या टँकरचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावरच टँकरला अडवून चालकाला खाली उतरवले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरचालक हा पूर्णपणे दारूच्या नशेत होता. संतप्त नागरिकांनी त्याला पकडून तातडीने पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांत गुन्हा दाखल या घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून हर्षचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. तसेच, अपघातग्रस्त टँकर आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. मद्यधुंद अवस्थेत आणि निष्काळजीपणे बेदरकार वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली ओशिवरा पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे. हेही वाचा… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा राज्यात पावसाचा जोर कायम:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
