
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ऐतिहासिक विजय स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. स्मारकाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, स्मारक पूर्ण झाल्यानंतर उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने सचिव कुंदनकुमार साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर, मदन मोडक तसेच माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी स्मारकाच्या उर्वरित कामांबाबत, आवश्यक निधी तसेच स्मारकाच्या भविष्यातील नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कुंदनकुमार साठे म्हणाले, मागील काही महिन्यांपासून पालखेड येथे स्मारकाचे बांधकाम सुरू आहे. निधीच्या कमतरतेमुळे कामाचा वेग काहीसा मंदावला असला तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेत सकारात्मक भूमिका घेतल्याने स्मारकाचे काम अधिक वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले, इतिहासातील सर्वाधिक यशस्वी लष्करी मोहिमांपैकी एक म्हणून पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला जातो. जगातील सर्वोत्तम दहा लढायांमध्ये या लढाईचा समावेश मानला जातो. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली ही लढाई मराठा सामर्थ्य, युद्धनीती आणि नेतृत्व कौशल्याचे प्रतीक मानली जाते. या गौरवशाली इतिहासाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने पालखेड येथे विजय स्मारक उभारण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
