
हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याचे गौडबंगाल संशोधनाचा विषय बनले आहे. त्यामुळे आता नेमक्या अफवा काय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये नाफेडने खरेदी केलेला 40 हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला आहे. मात्र शनिवारी ता. 13 वादळी वाऱ्यामुळे गोदामाचे टीनपत्रे उडून गेल्याने हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. या संदर्भात प्रसार माध्यमांतून बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक निलेश लांडे यांनी तातडीने प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. यामध्ये गोदामात साठवलेल्या या हरभरा पिकाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र या साठ्याचे नुकसान होऊन शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने संपूर्ण साठ्याचा विमा उतरविला आहे. नुकसानीची पाहणी विमा कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या साठ्याचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभाग प्रमुख, लातूर, साठा अधीक्षक जवळा बाजार तसेच इतर अधिकारी व प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित राहून गोदामातील साठा सुरक्षितपणे अन्य गोदामांमध्ये हलविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. महामंडळाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका दरम्यान, महामंडळाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे ठासून सांगितले जात आहे. मात्र गोदामातील साठा शेतकऱ्यांचा नव्हता, शेतकऱ्यांना पैसेही मिळाले आहे. मात्र आता अफवा कोणत्या पसरविल्या जात आहे याची उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार अफवांवर विश्वास ठेऊ नका असे का सांगितले जात आहे, या अफवांमध्ये कोणते गौडबंगाल लपले आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे आता या गोदामाच्या भाडेतत्वापर घेण्याचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
