
मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्शी शहरात जुन्या आणि नवीन अशा दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) असून, त्यात पुरेसे पाणी साठवण्याची क्षमता आहे. असे असूनही समर्थ कॉलनी, गुरुदेव नगरी, गेडाम लेआउट, गजानन कॉलनी, छायानगर, साई सिटी लेआउट, दीप कॉलनी आणि राधाकृष्ण कॉलनीच्या काही भागांत पाणी पोहोचत नाही. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. कॉलनी परिसराला गढूळ आणि अशुद्ध पाणी मिळत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय असून, त्याचे नियोजन ढिसाळ असल्यामुळे काही भागांत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे रोग पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर आणि ॲलनचे प्रमाण असंतुलित असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे, ही बाब जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत गंभीर असल्याचे नगरसेवक नितीन पन्नासे यांनी नमूद केले. समर्थ कॉलनीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवावे लागतात किंवा ‘वॉटर कॅन’ विकत घ्यावे लागतात. तरीही नगर परिषद प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना नगरसेवक नितीन पन्नासे यांच्यासह हर्षल चौधरी, नगरसेविका प्रीती ब्रह्मानंद देशमुख, जयश्री अजय आगरकर, प्रतिभा कैलास फंदे, मोनाली फंदे आणि इतर नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावरही यावेळी ठपका ठेवण्यात आला. दलितेतर योजनेतून ६० लाख रुपयांची निविदा काढूनही कंत्राटदाराने कुशल कामगार न वापरल्याने पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
