
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा व्हीआयपी लॉबीला न जुमानता त्यांनी केलेल्या या बेधडक कारवाईचे सध्या संपूर्ण राज्यभरातून मोठे कौतुक केले जात आहे. आपल्या निडर कार्यशैलीसाठी आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची ‘अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त’ पदावरील नियुक्ती ही त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील 25 वी बदली आहे. अवघ्या दोन आठवड्यांतच त्यांनी आपल्या कारवाईचा धडाका दाखवत भेसळखोरांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, त्यांचा आजवरचा पूर्वानुभव पाहता आता पुन्हा एकदा त्यांच्या बदलीच्या चर्चांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहत, त्यांच्या संभाव्य बदलीवरून राज्य सरकारला थेट आणि उघड इशारा दिला आहे. प्रशासकीय सेवेतील आपल्या 25 व्या बदलीच्या ठिकाणीही धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपला कडक बाणा कायम ठेवला आहे. अवघ्या दोन आठवड्यांत कोट्यवधी रुपयांचा अवैध साठा जप्त करत त्यांनी एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले असून, त्यांच्या या कारवाईचे सध्या राज्यभरातून मोठे कौतुक होत आहे. मात्र, जनहितासाठी कठोर निर्णय घेणाऱ्या या प्रामाणिक अधिकाऱ्याची नेहमीच अल्पावधीत बदली होण्याचा आजवरचा इतिहास पाहता, आता पुन्हा राजकीय दबावापोटी त्यांना हटवले जाणार की काम करू दिले जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांच्या संभाव्य बदलीच्या सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंढे यांच्या उत्कृष्ट कामाची प्रशंसा करत त्यांना आपला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? मनोज जरांगे म्हणाले, तुकाराम मुंढे हे खूप चांगले काम करत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यामुळे थेट सामान्य जनतेच्या आरोग्याला फायदा होणार आहे. तसेच दुधातील भेसळ थांबल्याने शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला चांगला भाव मिळेल. त्यामुळे सरकारने तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या भानगडीत अजिबात पडू नये, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन करत असलेले आमदार रोहित पवार यांची मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यावर जाताना भेट घेतली. मात्र, ही केवळ जाता जाता घेतलेली भेट असून यापलीकडे कोणताही संदर्भ नाही, असे स्पष्ट करत जरांगे पाटील यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा देण्याबाबत बोलणे टाळले. याचवेळी, राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ वरवरची कर्जमाफी न देता त्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अशी आग्रही मागणीही जरांगे पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
