
नागपूर: पश्चिम नागपूरचे ७० वर्षीय रमेश माटे यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित ‘मिनी इंडियाबुल्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यांनी १०० किलो वजन उचलून ही कामगिरी केली. माटे हे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि रामनगर व्यायामशाळेचे आजीव सभासद आहेत. रामनगर व्यायामशाळेचे वरिष्ठ मल्ल असलेल्या माटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दोन कठीण प्रकारांमध्ये सहभाग घेतला. ‘डेडलिफ्ट’ प्रकारात त्यांनी ८० किलो, ९० किलो आणि १०० किलो वजनाचे प्रयत्न यशस्वीरीत्या पूर्ण केले. ‘बेंच प्रेस’ प्रकारात त्यांनी ६५ किलो आणि ७० किलो वजनाचे दोन्ही प्रयत्न यशस्वी केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. वयाच्या सत्तरीतही रमेश माटे यांनी केलेल्या या परिश्रमाचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवि वाघमारे यांनी माटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भविष्यात पॅरिस येथे होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रमेश माटे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करावे आणि तिथेही अशीच सुवर्ण कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
