
मासे विक्रीसाठी दुकान लावण्याच्या कारणावरून बायजीपुऱ्यात शनिवारी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी रात्री घाटीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृताचे नातेवाइक, मित्र असा मोठा जमाव घाटीत जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातलगांनी घेतली. शाहरुख शकील खान (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. शाहरुख हा रिक्षाचालक होता. त्याचे चुलते व चुलत भावाचा माजेद व अक्रम यांच्यासोबत वाद होता. यातूनच शनिवारी जुना बायजीपुरा भागात आरोपींनी शाहरुखच्या चुलत्यावर हल्ला केला. शाहरुख वाद सोडवण्यासाठी गेला असता माजेद व अक्रमसह ४ ते ५ तरुणांनी शाहरुखवर हॉकीने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी फरार झाले. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी शाहरुखला घाटीत दाखल केले. मात्र सोमवारी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. आरोपी ठाण्यात आले होते.. शाहरुख व त्याच्या चुलत्यावर हल्ला केल्याच्या काही वेळानंतर आरोपी जिन्सी पोलिस ठाण्यातही आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. नंतर सर्व आरोपी पसार झाले. शाहरुखच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी घाटीत गर्दी करून ‘आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’ अशी भूमिका घेतली. या वेळी नगरसेवक मुन्शी पटेल हेही हजर होते. वातावरण तणावपूर्ण झाल्याने सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे, पो.नि. गजानन कल्याणकर, जिन्सीचे निरीक्षक गणेश ताठे घाटीत दाखल झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
