
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांनीही या उपक्रमात सहभागी होत चिमुकल्यांच्यासोबत बैलगाडीचे सारथ्य केले. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला. वाजंत्र्यांच्या गजरात, ग्रामस्थांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात चिमुकल्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेत आगमनानंतर मंत्री देसाई यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण संस्कृती, शिक्षणाबद्दलची आस्था आणि शाळेविषयीचा ग्रामस्थांचा जिव्हाळा या उपक्रमातून अधोरेखित झाला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या स्वागतासाठी एकवटलेल्या गावकऱ्यांचा उत्साह यामुळे मरळी येथील शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
