
पुणे येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रांगोळी प्रदर्शनातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि जीवन पुणेकरांसमोर उलगडले. या प्रदर्शनात सिंहाशी झुंज देणारे संभाजी महाराज, त्यांचा बंदिवासातील प्रसंग आणि मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे चित्रण करणाऱ्या रांगोळ्या विशेष लक्षवेधी ठरल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमांमध्ये विविध सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचा समावेश होता. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पियुष विजयकुमार शहा, उपाध्यक्ष निलेश खाणेकर, जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश ढमढेरे आणि उत्सव प्रमुख रोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीरंग कलादर्पणच्या कलाकारांनी या आकर्षक रांगोळ्या साकारल्या. प्रदर्शनातील रांगोळ्यांमध्ये संभाजी महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे एकत्रित दर्शन, राजमाता जिजाऊंसोबतचे त्यांचे नाते, राज्याभिषेक सोहळा तसेच त्यांचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठा दर्शवणारे विविध पैलू प्रभावीपणे मांडण्यात आले होते. या कलाकृतींमधून महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे आणि त्यांचे योगदान स्पष्टपणे दिसून आले. रांगोळी प्रदर्शनासोबतच दिवसभर विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच ईसीजी, सीबीसी, मधुमेह, रक्तदाब आणि दंत तपासणी यांसारख्या विविध आरोग्य तपासण्या उपलब्ध होत्या. याशिवाय, ‘रक्ताचा प्रत्येक थेंब अमूल्य’ हा संदेश देत भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गोशाळांना गोधनाच्या खाद्यस्वरूपात मदतही करण्यात आली, ज्यामुळे या जयंती उत्सवाला एक व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
