
जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून सूत्रे घेतली. पापळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, अपर आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, सहआयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविसकर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, उप मुख्य लेखाधिकारी साधना बांगर यांच्यासह अनेक प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत यांनी विभागप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती, सामाजिक आणि प्रशासकीय विषयांबाबत माहिती जाणून घेतली. सर्वांनी समन्वयाने काम करून विभागाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर विभाग सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे श्री. श्रीकांत यांनी नमूद केले. पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, महत्त्वपूर्ण उपक्रम आणि रोजगाराभिमुखतेवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. विभागाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेऊन राज्यात अग्रस्थानी आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रशासकीय कामकाजात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यावर भर दिला जाईल. ई-ऑफिस प्रणालीचा 100 टक्के अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्री. श्रीकांत हे 2009 च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी परभणी येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला, त्यानंतर किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी सहआयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त या पदांवर त्यांनी यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






