
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समाजाला सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होते, असे ते म्हणाले. खरी सेवा आपुलकीच्या भावनेतून निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. भागवत पुणे जिल्ह्यातील नांदोशी येथे ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभात बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आनंद भोसले आणि संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. भागवत यांनी लतादीदी आणि आशाताई यांच्या संगीताचे सामर्थ्य अलौकिक असल्याचे सांगितले. शिक्षण आणि आरोग्य या जीवनावश्यक गरजा असून, प्रत्येकाला सुलभ व परवडणाऱ्या सेवा मिळायला हव्यात, असे ते म्हणाले. शासन व प्रशासन या दिशेने प्रयत्न करत असले तरी, ‘हा देश माझा आहे’ या भावनेने समाजानेही अशा कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मंगेशकर कुटुंबाच्या देशभक्तीचा गौरव केला. मंगेशकर कुटुंबीय केवळ संगीतासाठीच नव्हे, तर प्रखर देशभक्तीसाठीही ओळखले जाते, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी या कुटुंबाचे घनिष्ठ नाते असल्याचेही त्यांनी सांगितले. पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेहमीच सेवाभाव जपून हजारो रुग्णांना उपचार दिले आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. आजच्या काळात ‘अफोर्डेबल केअर’ची मोठी गरज असून, धर्मादाय संस्था आर्थिक संकटामुळे व्यावसायिकीकरणाकडे वळत असल्या तरी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केवळ सेवा हाच उद्देश ठेवला आहे. हाच वारसा आता ‘लता-आशा’ रुग्णालयाच्या रूपाने विस्तारणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसराकडे येणारा रस्ता प्रशस्त करणे आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, धर्मादाय संस्थांना सवलती देण्याचाही प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






