
महावितरणने पुणे परिमंडळात गेल्या पंधरा दिवसांत धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई केली आहे. या कारवाईत वीजचोरांनी एकूण ३४०७३० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना ८१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५ आणि १३८ नुसार मीटरमध्ये फेरफार करून किंवा थेट वीज यंत्रणेतून आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरण कारवाई करते. तसेच, विजेचा वापर वेगळ्या कारणांसाठी केल्यास कलम १२६ अंतर्गत दंड आकारला जातो. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत वीजचोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी संपूर्ण परिमंडळात ही धडक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत, रास्तापेठ शहर मंडलात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली १ ते १६ जुलै दरम्यान ३७५ ठिकाणी वीजचोरी आढळून आली. या वीजचोरांनी ९०७९९ युनिट विजेची चोरी केली होती, ज्यापोटी त्यांना २३ लाख ३० हजार ८८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुणे ग्रामीण मंडलात अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांनी राबवलेल्या मोहिमेत ५८० वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी १३६९३० युनिट विजेची चोरी केली होती आणि त्यांना २९ लाख ८२ हजार ६६० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर, गणेशखिंड शहर मंडलात अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी ३२६ वीजचोरांवर कारवाई केली. या वीजचोरांनी ११३००१ युनिट विजेची चोरी केली होती, ज्यासाठी त्यांना २८ लाख ४२ हजार १९० रुपयांचा दंड आकारण्यात आला. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते जुलै) पुणे परिमंडळात एकूण २२८३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या चोरांनी ८७४५५९ युनिट विजेची चोरी केली होती, ज्यापोटी महावितरणने त्यांना ७ कोटी ६१ लाख ३१ हजार ६९० रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून, तिची चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. वीज कायद्यात दंडासोबतच कारावासाची तरतूदही आहे. तसेच, वीजचोरी करताना जीवितहानीचा धोकाही संभवतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
