
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्था (पुणे) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारानुसार, विद्यापीठातील १०० नवसंशोधकांची टप्प्याटप्प्याने निवड केली जाईल, ज्यापैकी सुरुवातीला २५ स्टार्टअप्सना या योजनेचा लाभ मिळेल. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एका वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप किंवा सीड फंडिंग मिळणार आहे. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देणे आणि संशोधनाला उद्योगाचे स्वरूप देणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमार्फत अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, कार्यालयीन सुविधा, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच व्यवसाय विकासासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे नवसंशोधकांना आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ मिळेल. कृषी तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील स्टार्टअप्सना या उपक्रमातून विशेष लाभ मिळणार आहे. पुढील तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येणार असून, संशोधनाधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील नाविन्यपूर्ण संशोधनाला उद्योगाचे रूप मिळण्यास मदत होईल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या सामंजस्य करारावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर, सीईओ आनंद यादव, अमोल हिरुळकर, ‘अमृत’ संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश हरिश कथलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
