
आखाडा बाळापूर येथे मध्यवर्ती बँकेतून काढलेले पैसे महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी जात असतांना अवघ्या ३५ मिनिटांच्या कालावधीत एका शेतकऱ्याचे ८२ हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. २ दुपारी घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील शेतकरी प्रभाकर पानपट्टे हे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी १२ वाजून १० मिनीटांनी पैसे काढून बँकेतून बाहेर पडले. त्यानंतर एका ठिकाणी चहा पिऊन ते १२ वाजून ४५ मिनीटाला महाराष्ट्र बँकेत पोहोचले. त्या ठिकाणी पैसे भरण्याची पावती लिहील्यानंतर त्यांनी पिशवीत पैसे काढण्यासाठी हात घातला असता पिशवीत पैसेच आढळून आले नाही. या प्रकारामुळे प्रभाकर हे घाबरून गेले. त्यांनी तातडीने पुन्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी थेट आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार बालाजी जोगदंड यांच्या पथकाने तातडीने दोन्ही बँकेत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. तसेच प्रभाकर हे ज्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली आहे. त्यावरून आता चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामध्ेय एक संशयीत महिला दिसून येत असून पोलिस त्या महिलेचा शोध घेत असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
