digital products downloads

नवी मुंबई विमानतळ वाद: नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, आता निर्णय सरकारच्या हाती! – Mumbai News

नवी मुंबई विमानतळ वाद:  नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, आता निर्णय सरकारच्या हाती! – Mumbai News



नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज थेट फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून, नामकरणाचा संपूर्ण चेंडू आता पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कुठल्याही वास्तूला किंवा ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही, असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावले. न्यायमूर्तींनी पुढे स्पष्ट केले की, हा विषय पूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे न्यायालय या प्रशासकीय प्रक्रियेत आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही. याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कायदेशीर सल्ला देत योग्य व्यासपीठावर जाण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्ही या मागणीसाठी संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जाऊन विचारणा करा, अशी सूचना कोर्टाने केली. त्यामुळे आता या विषयावरील कायदेशीर लढाई थांबली असली, तरी राजकीय आणि सामाजिक पातळीवरील हालचाली पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. अजून नाव देण्यात आले नाही नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि विविध संघटनांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात, विशेषतः कोकण पट्ट्यात मोठी आंदोलने केली होती. या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारनेही यापूर्वी या नावाचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतरही त्यांचे नाव अद्याप अधिकृतपणे देण्यात आलेले नाही. याच कारणामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर या नावाचा अंतिम निर्णय संपूर्णपणे केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण होते लोकनेते दि. बा. पाटील? लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली शेतकरी नेते आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे बुलंद आवाज होते. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते असलेल्या दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईच्या उभारणीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांना 12.5 टक्के परतावा मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक आंदोलन उभारले होते. सिडको ही सरकारी संस्था जेव्हा नवी मुंबईची बांधणी करत होती, त्या काळात पाटलांनी सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व करत न्याय मिळवून दिला होता. नगराध्यक्ष ते खासदार म्हणून काम दि. बा. पाटील यांची राजकीय कारकीर्दही तितकीच थक्क करणारी होती. ते पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष राहिले होते. याशिवाय त्यांनी पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे 5 वेळा आमदार, एकदा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे 2 वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या लोकनेत्याचे स्मरण म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी स्थानिकांची तीव्र भावना आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp