
पंजाबमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईचा ‘काळा दिवस’ असा उल्लेख केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजनांची ही भूमिका निव्वळ वैयक्तिक असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत, कदाचित त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्याकडून असे विधान झाले असावे, असे केंद्रीय वर्तुळातून सांगण्यात आले आहे. तसेच, या कार्यक्रमाशी किंवा महाजनांच्या वक्तव्याशी भाजपच्या रणनीतीचा कोणताही संबंध नसून, अशा प्रकारची कोणतीही रणनीती पक्षाला मान्य नसल्याचेही वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे. गिरीश महाजन यांच्या या कार्यक्रमातील सहभागावर आणि त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रतन शारदा यांनी महाजनांना पंजाबचा इतिहास आणि खलिस्तानी दहशतवादाची खरोखरच जाण आहे का, असा संतप्त सवाल केला आहे. कृपया आपण महाराष्ट्रात परत जावे- रतन शारदा रतन शारदा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अत्यंत नम्रपणे मी गिरीश महाजन यांना विचारू इच्छितो की, त्यांना खरोखरच पंजाबचा इतिहास किंवा खलिस्तानी दहशतवाद माहित आहे का? आम्ही तो काळ अनुभवला आहे. भिंद्रनवालेच्या काळात जवळपास 30 हजार हिंदू आणि 50 हजार शिखांच्या हत्या झाल्या, मात्र संघ किंवा भाजप त्यांच्यासमोर कधीही झुकला नाही. कृपया आपण महाराष्ट्रात परत जावे आणि पंजाब भाजप तसेच शीख-हिंदू संबंध खराब करू नयेत. दरम्यान, जून 1984 मधील शीख इतिहासाच्या संघर्षमय परवंट शहीद झालेल्या सर्व शीख वीर-विरांगनांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित 42 व्या शहीद समागम कार्यकरमास उपस्थित राहिल्याचे गिरीश महाजन यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाजन यांनी केलेल्या विधानाला सवरण्याचे काम करताना दिसून आले आहेत. गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर काय म्हणाले फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वात दिल्ली आणि संपूर्ण भारतात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही. काँग्रेसने केलेल्या या अत्याचाराचा निषेध आम्ही जन्मभर आणि शेवटपर्यंत करू. तसेच गिरीश महाजन यांचे पूर्ण वक्तव्य पाहिले तर कोणताही प्रश्न उरणार नाही. शिखांचे नववे गुरू यांच्या 300 व्या शहिदी दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. याच कृतज्ञतेपोटी पंजाबमधून महाराष्ट्र सरकारचा गौरव करण्यासाठी गिरीश महाजन यांना निमंत्रण आले होते. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांनी तिथे जाऊन केवळ दर्शन घेतले. ते अतिशय थोडा वेळ त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे कोणाचा फोटो लागलेला आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांनी आपल्या भाषणात केवळ शीख समाजाचा गौरव केला आहे. भारताच्या वाटचालीत शीख समाजाचे योगदान आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेले कार्य यावरच महाजन बोलले आहेत. तसेच पंजाबमधील वाढत्या ड्रग्सच्या समस्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे अन्य कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
