
विधान परिषदेत ३० वर्षे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्यावर शनिवारी सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष आदेशानुसार, हिंदू स्मशानभूमीत हा विधी पार पडला. त्यांच्या दोन मुली, वैशाली वानखडे आणि दीपा लाड, यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी संघर्ष करत असलेल्या प्रा. देशमुख यांची प्राणज्योत शनिवारी रात्री मालवली. त्यांचे पार्थिव दिवसभर विदर्भ महाविद्यालयानजिकच्या सुयोग कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून वनमंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते. प्रा. बी.टी. देशमुख हे १९८० साली पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आणि तब्बल ३० वर्षे त्यांनी सभागृहात प्रतिनिधित्व केले. विदर्भाचा सर्वच क्षेत्रातील अनुशेष त्यांना मुखोद्गत होता, ज्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक मंत्र्यांना कठीण जात असे, अशी त्यांची ख्याती होती. या काळात त्यांनी अमरावतीचा पाणी प्रश्न, शेतमालाच्या भावाचा प्रश्न आणि सिंचनासाठीच्या पाण्याचे नियोजन यांसारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे सोडवून घेतले. त्यांनी काही काळ विधान परिषदेचे हंगामी सभापती म्हणूनही काम पाहिले. प्रा. देशमुख यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्रीच सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी संयुक्तपणे अंत्यसंस्काराचे नियोजन केले. या अंत्ययात्रेत माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, प्रा. श्रीकांत देशपांडे, माजी महापौर मिलींद चिमोटे, ॲड. किशोर शेळके, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, ॲड. दिलीप एडतकर, विलास मराठे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, एसडीओ अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, नुटाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी अंत्ययात्रा होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
