
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था दूर करणे हे या निधीचे मुख्य उद्दिष्ट आहे. भाविक आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे आमदार वानखडे यांनी सांगितले. मंजूर झालेल्या ७२ कोटी रुपयांपैकी गुरुकुंज मोझरी विकास आराखड्यासाठी ५० कोटी रुपये, कौंडण्यपूरसाठी १२ कोटी रुपये आणि वलगावसाठी १० कोटी रुपये असे वाटप करण्यात आले आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून रखडलेली इमारतींची दुरुस्ती, नवीन बांधकामे तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये भक्तनिवास, आधुनिक प्रसाधनगृहे, पाणीपुरवठा व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प, अंतर्गत रस्ते आणि परिसर सुशोभिकरण यांसारख्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर येणाऱ्या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा मिळतील, तसेच स्थानिक पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. आमदार वानखडे यांनी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, विकासकामांना तातडीने सुरुवात करून पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
