
अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ९ तालुक्यांना फटका दिला आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा फार कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात केवळ १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या सरासरी (१९२.८ मिलीमीटर) पेक्षा हा पाऊस ३० टक्क्यांनी कमी आहे. यावर्षीच्या कमी पावसामुळे जून महिन्यात पर्यटकांनी चिखलदऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. आकडेवारीनुसार, यावर्षी सर्वात कमी पाऊस भातकुली तालुक्यात झाला, जिथे सरासरीच्या केवळ ६१.९ टक्के पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ धामणगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे सरासरीच्या ६८.९ टक्के पाऊस पडला. चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के, अचलपूर तालुक्यात ७४.५ टक्के, अमरावती तालुक्यात ८१.३ टक्के, तिवसा तालुक्यात ८२.७ टक्के, चांदूर रेल्वे तालुक्यात ९१.५ टक्के, धारणी तालुक्यात ९१.९ टक्के आणि वरुड तालुक्यात ९९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अशा प्रकारे जून महिन्यातील पावसाने एकूण ९ तालुक्यांना सरासरी गाठता आली नाही. हवामानतज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत हे तालुके सरासरीच्या जवळ पोहोचू शकतात. याउलट, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १६३.२ मिमी पावसाची नोंद झाली, जी जून महिन्याच्या सरासरीच्या (११७.७ मिमी) १४६.१ टक्के आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १४०.१ मिमी (१२९.६ टक्के), दर्यापूर (१२६.२ मिमी), नांदगाव खंडेश्वर (१२६.१ मिमी) आणि अचलपूर (११२.१ मिमी) या तालुक्यांमध्येही पावसाची स्थिती समाधानकारक आहे. चिखलदरा येथे कमी पाऊस पडण्यामागे अल नीनोसोबतच मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. चिखलदरा शहर, शहापूर, आलाडोह, मोथा, लवादा आणि आसपासच्या परिसरात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. याबाबत हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी सांगितले की, “चिखलदरा हे पर्वतराजीमध्ये वसलेले उंचावरील ठिकाण आहे, जिथे दरवर्षी जास्त पाऊस पडतो. परंतु यावर्षी अल नीनो आणि मोठ्या वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
