
राज्यातील शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, खासगी शाळांची मनमानी आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी बोगस बियाणे व खतांची टंचाई या मुद्द्यांवरून गुरुवारी विधान परिषदेत गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी मंत्र्यांना धारेवर धरल्याने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, गुजरातकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उघड लूट चालली आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. पुण्यासह राज्यातील अनेक खासगी आणि सीबीएसई शाळांकडून पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा सदस्य सुधाकर आडबाले, शिवाजीराव गर्जे आणि धीरज लिंगाडे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. “बाजारपेठेत 400 रुपयांना मिळणाऱ्या वह्या-पुस्तकांसाठी शाळा 900 रुपये आकारत आहेत. सीनियर केजीच्या पुस्तकांसाठी तब्बल 3,744 रुपये, तर आठवीसाठी 9,881 रुपये वसूल केले जात आहेत. विशिष्ट दुकानातूनच खरेदीची सक्ती करणाऱ्या अशा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. तुमचे शिक्षण अधिकारी झोपले आहेत का?” असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला. ‘शिक्षणाधिकारी काय करतात ?’ दरेकरांचा सवाल शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी, ज्या शाळांबाबत तक्रारी आहेत, त्यांची यादी सदस्यांनी द्यावी, कारवाई करू, अशी सूचना केली. यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर प्रचंड संतप्त झाले. लाखो रुपयांचा पगार घेणारे शिक्षणाधिकारी नेमके काय करतात? लोकप्रतिनिधींनीच याद्या द्यायच्या असतील, तर तुमची स्वतःची यंत्रणा काय करत आहे? या मुद्द्यावरून मंत्री भोयर आणि दरेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर मंत्र्यांनी पालकांची लूट होत असल्याचे मान्य करत, केंद्रीय शाळांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी विभागीय उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालकांना “नोडल ऑफिसर’ (समन्वय अधिकारी) म्हणून नेमण्याची घोषणा केली. तसेच शाळांना “एनओसी’ देताना कडक अटी घालण्याचे आश्वासन दिले. कृषी राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुरवठ्याबाबत आकडेवारी सादर करताना सांगितले की, “राज्याला 48.80 लाख मेट्रिक टन खतांची मंजुरी मिळाली आहे. जूनअखेर 17.99 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला असून, ऐन वेळेस टंचाई भासू नये म्हणून युरिया आणि डीएपी खताचा मोठा संरक्षित साठा करून ठेवण्यात आला. …तर मंत्री म्हणून मीही जोरात बोलू शकतो : पंकज भोयर चर्चेदरम्यान जेव्हा प्रवीण दरेकर आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यात खडाजंगी झाली, तेव्हा मंत्री भोयर यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. “उत्तर समजून न घेता जर एखादा सदस्य सभागृहात जोरजोरात बोलत असेल, तर मंत्री म्हणून मीदेखील जोरात बोलू शकतो,” असे म्हणत भोयर यांनी दरेकरांना प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू यांचाही आपल्याच सरकारला घरचा आहेर आमदार सदाभाऊ खोत यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी कृषी विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. जुलै महिना सुरू होऊन पाऊस सर्वदूर पडत असला, तरी शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाहीत. राज्यात बोगस बियाण्यांचा पुरवठा थेट गुजरातमधून होत असून, गुजरातकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उघड लूट चालली आहे, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला. तसेच, सरकार सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करते, मात्र रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय खतांना अनुदान का देत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लक्षवेधीवर बोलताना सदाभाऊ खोत यांनीही सरकारला घरचा आहेर दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
