
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असला तरी काही ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक पावसाची परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच राज्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कृषिमंत्री भरणे म्हणाले की, सध्या राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण विभागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, नाशिक विभागात तुलनेने कमी पाऊस झाला असून आजच्या हवामान अंदाजानुसार त्या भागातही पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला. “ज्या भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा,” असे ते म्हणाले. राज्यात बियाणे आणि खतांचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत भरणे यांनी सांगितले की, शासनाकडे आवश्यक प्रमाणात बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. याचबरोबर बियाणे किंवा खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “बियाणे किंवा खतांचा काळाबाजार करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल,” असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा… उद्घाटनाच्या दोनच महिन्यांत फज्जा:काय आहे मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प? खड्डे आणि दरड दुर्घटनेवरून विरोधकांचे सरकारला जळजळीत प्रश्न मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पहिल्याच मुसळधार पावसात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत, तोच बोगद्यांमध्ये झालेली पाण्याची गळती, मुख्य रस्त्याला गेलेले तडे आणि दरड दुर्घटना यामुळे या 7 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरूनच आता विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरत, हा तांत्रिक चमत्कार आहे की कंत्राटदारांना पोसणारा कमिशनखोरीचा नवा मार्ग?” असे जळजळीत प्रश्न उपस्थित करत सरकारची कोंडी केली आहे. सविस्तर वाचा… शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
