खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला: एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना – Jalgaon News

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:  एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना – Jalgaon News



जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी काढण्याच्या नादात ३ निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सेल्फी घेताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने आणि त्यानंतर तिसऱ्याने एकमेकांचे हात धरले; मात्र दुर्दैवाने तिघेही ३० फूट खोल पाण्याच्या डोहात ओढले गेले. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा पसरली आहे. मानव बंटी रतनानी, कार्तिक विकी उधवानी आणि दिनेश विजय पंजवानी अशी मृत मुलांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरमधील सिंधी कॉलनीतील तीन मित्र मंगळवारी संध्याकाळी चोपडा रस्त्यावरील खदाणीच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. खदाणीच्या मध्यभागी एक बेटासारखा उंचवटा (टेकडी) आहे. तिथे जाण्यासाठी सुरुवातीला केवळ एक फूट इतकेच पाणी असल्याने तिन्ही मुले चालत त्या उंचवट्यावर चढली. उंचवट्यावर उभे राहून सेल्फी काढत असताना अचानक एका मुलाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. त्याला बुडताना पाहून दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी पुढे होऊन हात दिला, मात्र तोही पाण्यात ओढला जाऊ लागला. अखेर त्या दोघांना वाचवण्यासाठी तिसऱ्या मित्रानेही धावून जात हात धरला. परंतु, खोली जास्त असल्याने तिघांचाही तोल गेला आणि ते ३० फूट खोल पाण्यात बुडाले. हा सर्व प्रकार तिथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या नजरेस पडला. त्याने तात्काळ आरडाओरड करत खदाणीकडे धाव घेतली आणि एका नागरिकाने तातडीने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. स्थानिक तरुणाचे धाडस; प्रशासनाकडून पंचनामा घटनेची माहिती मिळताच देवळी गावातील स्थानिक नागरिक आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यु. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्यादरम्यान देवळी येथील धाडसी तरुण दीपक मोरे याने जीवाची पर्वा न करता खदाणीच्या खोल पाण्यात उडी घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याने तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिघांचेही प्राण हवेत विरले होते. पोलीस निरीक्षक निकम आणि हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांमध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश या दुर्घटनेत मृत्यू झालेले तिन्ही मुले अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील होती. एकाच वेळी तीन उमलते जीव गेल्याने सिंधी कॉलनी परिसरात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. मानव बंटी रतनानी (वय १४ वर्षे) हा ‘पीबीए इंग्लिश मिडियम स्कूल’मध्ये इयत्ता ९ वीत शिकत होता. त्याचे वडील हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करतात. कार्तिक विकी उधवानी (वय १४ वर्षे) हा देखील ‘पीबीए स्कूल’मध्ये ९ वीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील एका बेकरीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दिनेश विजय पंजवानी (वय १७ वर्षे) हा प्रताप कॉलेजमध्ये ११ वी कॉमर्सला शिकत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो स्वतः एका दारूच्या दुकानात कामगार म्हणून काम करत होता. अमळनेर पोलिसांचे नागरिकांना आवाहन या भीषण दुर्घटनेनंतर अमळनेर पोलीस प्रशासनाने कडक इशारा आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “सध्या पावसाळ्याचे दिवस असून परिसरातील नाले, तलाव आणि खदाणी पाण्याने पूर्णपणे भरलेल्या आहेत. वरून शांत दिसणाऱ्या या पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज कोणालाही येऊ शकत नाही. त्यामुळे लहान मुलांनी, तरुणांनी आणि पोहता येत नसलेल्या नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी किंवा पर्यटनाच्या नावाखाली अशा धोकादायक जलाशयांच्या ठिकाणी अजिबात जाऊ नये. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे,” असे आवाहन पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले. हे ही वाचा… चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्‍यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी येथे सोमवारी मध्यरात्री हा गोळीबाराचा थरार घडला. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर आरोपीने सासर्‍याला फोन करून ‘ तुझ्या पोरीला गोळ्या घातल्यात आता तुझ्याकडे येतो.’ अशी धमकी देऊन तो फरार झाला. सविस्तर वाचा…
नवी मुंबईत भीषण अपघात:तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp