
पुण्यात बनावट मीठ आणि औषध विक्रीचे दोन मोठे प्रकार उघडकीस आले आहेत. नामवंत कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने विकल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फुरसुंगी आणि नऱ्हे पोलीस ठाण्यात या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. फुरसुंगी येथील आरंभ डिस्ट्रीब्युटर्सच्या गोदामात एका नामवंत कंपनीच्या नावाने बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा आढळून आला. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा देवीप्रसाद कनोजिया (वय ५०, कुरार व्हिलेज, मालाड, मुंबई) यांनी या संदर्भात फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कनोजिया हे संबंधित नामवंत कंपनीच्या वतीने काम पाहतात. कनोजिया यांना हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागातील गोदामात बनावट मीठाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती फुरसुंगी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. माने पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागातील सात्विक फार्मा शॉप या औषध विक्री दुकानातून बनावट औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणले. एफडीएच्या निरीक्षक श्रृतिका जाधव यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सात्विक फार्मा शॉपच्या मालकासह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिक्कीममधील सनफार्मा लॅबोरेटरीज या कंपनीच्या ‘लेबीपील’ नावाच्या गोळ्यांच्या नावाने बनावट गोळ्या विकल्या जात असल्याचे एफडीएच्या तपासात समोर आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
