
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे एका २६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेवर दुर्मिळ प्रकारच्या स्तन कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेत गर्भधारणा कायम ठेवून महिलेच्या उजव्या स्तनाची मास्टेक्टॉमी करण्यात आली. सध्या आई आणि गर्भातील बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लोणावळा परिसरातील २७ वर्षीय महिलेला सुमारे सहा महिन्यांपूर्वी उजव्या स्तनामध्ये गाठ जाणवली होती. सुरुवातीला हा गर्भधारणेदरम्यान होणारा सामान्य बदल समजून त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, गाठ वेगाने वाढू लागल्यानंतर, तसेच सतत ताप आणि स्तनावर जखम झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान स्तनामध्ये सुमारे आठ बाय आठ सेंटीमीटर आकाराची संक्रमित जखम आढळली. बायोप्सीनंतर तिला ‘हाय-ग्रेड ब्रेस्ट सारकोमा’ असल्याचे निदान झाले. स्तनातील सारकोमा हा स्तनाच्या कर्करोगाचा अत्यंत दुर्मिळ प्रकार असून, एकूण रुग्णांपैकी एक टक्क्याहून कमी प्रकरणांमध्ये तो आढळतो. गर्भधारणेदरम्यान हा आजार आढळणे आणखी दुर्मिळ मानले जाते. जखमेतील संसर्ग रक्तात पसरल्यास सेप्सिस किंवा सेप्टिक शॉकचा धोका निर्माण होऊ शकत होता. यामुळे आई आणि गर्भातील बाळाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. उत्कर्ष अजगावकर, सर्जन डॉ. मधुरा आणि भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास कौल यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने ही उच्च जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. गर्भधारणेमुळे रेडिएशनवर आधारित काही तपासण्या करता येत नसल्याने, उपलब्ध वैद्यकीय अहवालांच्या आधारे उपचारांचे नियोजन करण्यात आले. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ज्ञांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान आईचा रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी आणि गर्भातील बाळाच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर महिलेला घरी सोडण्यात आले आहे. प्रसूतीनंतर पीईटी स्कॅन करून कर्करोगाचा प्रसार तपासला जाईल आणि त्यानुसार पुढील उपचार निश्चित केले जातील. गर्भधारणेदरम्यान स्तनातील गाठ वेगाने वाढत असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/