
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ जुलै रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग खचून पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. महापालिकेने नोटिशीत म्हटले आहे की, प्राथमिक तपासात सुरक्षा नियम, करारातील अटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, तसेच सीपीसीबी व एमपीसीबीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची नियंत्रणात ठेवणे, स्लोप स्टॅबिलिटी, जोखीम विश्लेषण, पर्जन्यजल व्यवस्थापन, नियमित निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोपही नोटिशीत करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा धोकादायक परिस्थितीबाबत सूचना मिळाल्या होत्या का, याबाबतही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. महापालिकेने कंपनीला संबंधित घटनेबाबत कायदेशीर व मुद्देसूद खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंपनीची बँक गॅरंटी जप्त करणे, भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करणे तसेच अन्य कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे. दरम्यान, मोशी दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत (पीसीएमसी) संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांचा पदभार मनपा आयुक्तांनी काढला आहे. प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कार्यभाराचे फेरवाटप करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, मुख्य अभियंता-२ प्रमोद आंबसे यांच्याकडे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडील पर्यावरण अभियांत्रिकी, जलनिःसारण मुख्य कार्यालय, झोननिहाय स्थापत्य तसेच बीएसयुपी व पीएमएवाय विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) सोहन निकम यांच्याकडे योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
