
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘महर्षी कर्वे व्याख्यानमाले’त जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ‘थॅलेसेमिया’ या रक्तविकारावर मार्गदर्शन केले. थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दिवसभरात संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी व्हिजन इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषपथकाद्वारे पुतळ्यास मानवंदना दिली. ‘आव्हान रक्तविकारांचे’ या विषयांतर्गत डॉ. अतुल कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम विद्या संकुलात पार पडले. या व्याख्यानात त्यांनी थॅलेसेमिया या घातक रक्तविकाराविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य मंदार पारखी, सीमा कांबळे, वित्त समिती अध्यक्ष सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विविध शाखांचे शाखाप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच युट्यूब लिंकद्वारे आभासी स्वरुपातही सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात डॉ. न. म. जोशी लिखित ‘भारतरत्न महर्षी कर्वे’ या मराठी पुस्तकाचा श्रीमती विनया बापट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. संस्थेच्या वतीने विनया बापट आणि डॉ. न. म. जोशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर दोघांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी मानवी देहाला निसर्गाची उत्कृष्ट निर्मिती संबोधत, रक्त हा त्यातील अलौकिक घटक असल्याचे सांगितले. शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्तपेशी करतात. मात्र, त्यात विकार उत्पन्न झाल्यास शरीराच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. थॅलेसेमिया हा असाच एक अनुवांशिक रक्तविकार आहे. रक्तातील लाल रक्तपेशी योग्य पद्धतीने तयार न होणे हे या विकाराचे मुख्य लक्षण आहे. सर्व शारीरिक गुणधर्म गुणसूत्रातून संक्रमित होतात, त्याचप्रमाणे काही विकारही संक्रमित होतात. आई आणि वडील दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असल्यास पुढच्या पिढीत हा विकार उद्भवू शकतो, असे त्यांनी सांगितले. आज महाराष्ट्रात १५०० पेक्षा अधिक मुलांना या विकारामुळे नियमित रक्त भरून घ्यावे लागते. एका थॅलेसेमियाग्रस्त मुलास दर वर्षी १० ते १५ रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. या मुलांवर उपचार करण्यासोबतच थॅलेसेमिया उद्भवूच नये यासाठी व्यापक जनजागरणाची नितांत आवश्यकता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






