
इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाई आणि महागाईचे सावट असतानाच, वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डिझेल वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला असून, सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चक्क जीव धोक्यात घालून गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बोथुडा दरम्यान हा अपघात घडला. डिझेलने भरलेला हा टँकर समुद्रपूरच्या दिशेने जात असताना अचानक त्याचे टायर फुटले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाला. सुदैवाने, या मोठ्या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. सद्यस्थितीत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असल्याने आणि काही पंपांवर तुटवडा जाणवत असल्याने, स्थानिक ग्रामस्थांनी डिझेल गोळा करण्यासाठी मिळेल त्या भांड्यासह घटनास्थळी धाव घेतली. लोक चक्क ड्रम, बॅरेल, बादल्या आणि डबे घेऊन सांडलेले डिझेल भरण्यासाठी एकमेकांवर तुटून पडले होते. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर डिझेल बाहेर पडल्याने ते जवळच्या शेतात साचले होते, ते गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी धावाधाव सुरू होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर डिझेल नेणे बंद घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नागरिकांनी डिझेल नेणे बंद केले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. महागाई आणि इंधन टंचाईचे संकट हा अपघात अशा वेळी घडला आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय युद्धाच्या झळा भारतालाही सोसाव्या लागत आहेत. इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच होरपळून निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतेच पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर देशातील नागरिकांना इंधनाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. अशा कठीण परिस्थितीत डिझेलचा टँकर पलटी झाल्याने नागरिकांनी आपली गरज भागवण्यासाठी ही जोखीम पत्करल्याचे दिसून आले. अशा घटनांमध्ये इंधनाला आग लागण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
