
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची काल नाशिक येथे विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत खरातशी असलेल्या संबंधांचा शोध घेतला. दरम्यान, रूपाली चाकणकर एसआयटी चौकशी काय म्हणाल्यात याचा तपशील समोर आला आहे. मी अशोक खरातला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते. मात्र, त्याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावा रूपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीत केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर तेजस्वी सातपुते यांनी त्यांना अनेक रोखठोक सवाल विचारले. मला खरातची दुसरी बाजू माहीत नव्हती – चाकणकर चौकशीदरम्यान रूपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडताना खरातसोबतचे संबंध केवळ ‘आध्यात्मिक’ असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, “आमचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे. त्यामुळे आम्ही केवळ आध्यात्मिक श्रद्धेपोटी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला ‘गुरू’ मानले होते. खरातच्या काळबाजाची मला कोणतीही कल्पना नव्हती. माझे त्याच्याशी कोणतेही आर्थिक संबंध नाहीत, तसेच मी कोणालाही त्याच्याकडे जाण्याचा आग्रह धरला नाही.” तपासात पूर्ण सहकार्याचे आश्वासन सहा तासांच्या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरे दिली आहेत. तपासात पोलिसांना जे काही सहकार्य लागेल, ते मी पूर्णपणे करेन. चौकशीचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल,” असे त्यांनी नमूद केले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






