
नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट असली, तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. एका जबाबदार नेत्याने असे चिथावणीखोर वक्तव्य करणे अयोग्य असून पोलिसांनी त्यांना समज द्यायला हवी, अशी भूमिका सरोदे यांनी मांडली. तसेच, याप्रकरणी प्रवीण तरडे यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली असून, भावना कितीही तीव्र असल्या तरी आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहूनच शिक्षा झाली पाहिजे, असे सरोदे यांनी म्हटले आहे. असीम सरोदे म्हणाले की, नसरापूर या गावात एका 75 वर्षांच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या चिमुरडीच्या कुटुंबाचे दुःख आपण कुणीही समजून घेऊ शकत नाही. त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. या केसमध्ये 101 टक्के त्या नराधमाला फाशीची शिक्षाच होणार हे कायदेशीर वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. पुढे बोलताना असीम सरोदे म्हणाले, या प्रकरणात काहीही बेताल वक्तव्य करत लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि त्या माणसाला हालहाल करून मारा, आपणच त्याला शिक्षा देऊयात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे प्रवीण तरडे यांनीसुद्धा असे वक्तव्य केले. त्या आरोपीला मारणाऱ्याला आमदार खासदार करा असे प्रवीण तरडे म्हणाले. असे असेल तर प्रवीण तरडे स्वतःच का जात नाहीत? स्वतः त्या आरोपीला मारून आमदार आणि खासदार का होत नाहीत? आमदार आणि खासदार व्हायचे कायदेशीर निकष आता तुम्ही बदलणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांना उद्देशून बोलताना असीम सरोदे म्हणाले, तुमच्या भावना जरी बरोबर असल्या तरी कायद्याचे एक तत्व आहे. आरोपीला त्याची बाजू मांडू देऊन, कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. राज ठाकरे यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवू नये. हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशी समज पोलिसांनी राज ठाकरेंनादिली पाहिजे. राज ठाकरे आणि प्रवणी तरडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही नोंद होऊ शकतो, असे सरोदे यांनी म्हटले आहे. नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे? नसरापूर येथील अमानवीय घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून, या प्रकरणातील नराधमाला हाल हाल करून संपवले पाहिजे, अशी आक्रमक मागणी केली आहे. यासोबतच, महाराष्ट्रात सध्या कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






