
अभिनेता रितेश देशमुख याचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा ‘राजा शिवाजी’ चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई करत तब्बल 11.70 कोटींचा गल्ला खिशात टाकला आहे.
.
महाराष्ट्रातील दमदार कामगिरीमुळे आकडेवारीला बळ
ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या वृत्तानुसार, राजा शिवाजी चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने मराठीत तब्बल 8.75 कोटी रुपयांचा गल्ला केला. तर हिंदीत 2.95 कोटींची कमाई केली. आज व उद्या विकेंड आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व एन्ट्रीचे मुख्य श्रेय त्याच्या मराठी आवृत्तीला जाते. महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन अशा दोन्ही ठिकाणी या आवृत्तीने प्रेक्षकांची जोरदार उपस्थिती नोंदवली आहे.
दुसरीकडे, हिंदी आवृत्तीच्या आगाऊ तिकीट विक्रीनेही गती पकडली असून, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पहिल्या दिवसाची एकूण कमाई (gross) १ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
‘सैराट’चा रेकॉर्ड मोडला
‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण 5.14 कोटी रुपयांची कमाई केली. त्यात केवळ मूळ मराठी आवृत्तीद्वारेच अंदाजे 4.25 कोटी रुपये (निव्वळ 3.60 कोटी रुपये) इतकी कमाई झाली. या कामगिरीसह या चित्रपटाने ‘सैराट’ आणि ‘टाइमपास 2’ यांचे पहिल्या दिवसाच्या कमाईचे अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड सहजपणे मोडीत काढले. ‘सैराट’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.23 कोटींची कमाई केली होती. तर ‘टाईमपास 2’ ने 3.75 कोटी कमावले होते.
विशेष म्हणजे, कंगणा रणोट अभिनित ‘मणिकर्णिका’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही ‘राजा शिवाजी’ने मागे टाकले आहे. ‘मणिकर्णिका’ने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी 8.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण तानाजी आणि छावा सारख्या ऐतिहासिक चित्रपटांच्या तुलनेत ‘राजा शिवाजी’ची कमाई अद्याप कमी असल्याचे दिसत आहे.
रितेश – जिनिलियाचा मुलगा बाल शिवाजीच्या रुपात
राजा शिवाजी हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. राजा शिवाजीत रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारली असून जेनेलिया डिसूझाने सईबाईंची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, रितेश व जिनिलियाच्या मुलाने चित्रपटात बाल शिवाजीची भूमिका साकारली आहे.
सलमान खान ‘जिवा महाला’च्या रुपात
या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेषतः रितेशच्या इतर चित्रपटांप्रमाणे सलमान खानने या चित्रपटाही छोटीशी भूमिका साकारली आहे. त्याने जिवा महालाची खास भूमिका साकारली आहे. सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






