
नाशिक येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळी एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्योती अहिरे नावाच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांच्यावर मेडिकल कॉलेजमध्येच तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या संपूर्ण थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर मोठी खळबळ उडाली आहे. दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक ही इक्विपमेंट लिफ्ट अंगावर पडल्याने ज्योती अहिरे यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने घटनास्थळी धाव घेऊन केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मेडिकल कॉलेज प्रशासनाने अंतर्गत चौकशी समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, आडगाव पोलिसांनी या दुर्घटनेचा तपास सुरू केला असून, या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पीडित नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. नेमकी घटना कशी घडली? शस्त्रक्रिया विभागातील साहित्याची ने-आण करण्यासाठी असलेल्या स्वतंत्र लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावणे ज्योती अहिरे यांच्या जिवावर बेतले. ही लिफ्ट रुग्ण किंवा नागरिकांसाठी नसून केवळ साहित्यासाठी वापरली जाते. मात्र या लिफ्टचा मार्ग रिकामा असल्याचे पाहून त्यांनी आत डोकावले असता, नेमकी त्याच वेळी वरून आलेल्या लिफ्टमध्ये त्यांची मान दुर्दैवाने अडकली. या भीषण अपघातामुळे झालेल्या आवाजाने परिसरातील इतर महिला कर्मचारी हादरून गेल्या आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






