
पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. “ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगत पत्रके वाटणाऱ्या या तिघांनाही येत्या १० मे २०२६ पर्यंत भारत सोडून जाण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहेत. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५३, ६५ आणि ६६ वर्षे वयोगटातील हे तीन अमेरिकन नागरिक १९ ते २१ एप्रिल दरम्यान पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. २६ एप्रिलपासून ते पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. २७ एप्रिल रोजी सकाळी हे तिघे पुण्याच्या शुक्रवार पेठ भागात फिरत असताना, त्यांनी एका खाजगी कॅब ड्रायव्हरला थांबवून त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्याला बायबल आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पत्रके देऊन धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला. कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटले संबंधित कॅब चालकाने या प्रकाराची माहिती परिसरात रॅलीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. पोलिसांनी तातडीने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धार्मिक पत्रके आढळून आली. पुणे शहर पोलिसांच्या परदेशी नोंदणी कार्यालयाने (FRO) केलेल्या चौकशीत हे तिघेही पर्यटक व्हिसावर आले असताना धार्मिक प्रचार करत असल्याचे निष्पन्न झाले, जे भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. पोलिसांनी तिघांना ‘लीव्ह इंडिया नोटीस’ बजावली परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, “व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या तिघांना ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आली आहे. त्यांना १० मे २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.” तपासात असेही समोर आले की, यापूर्वीही हे नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बिझनेस व्हिसावर भारतात आले होते, मात्र त्यांचा मुख्य उद्देश धर्मप्रसार हाच असल्याचे दिसून आले आहे. जुलै २०२५ मधील घटनेची पुनरावृत्ती पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जुलै २०२५ मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका ४१ वर्षीय अमेरिकन नागरिकाला अटक केली होती. तो २०१६ पासून सातत्याने भारतात येत होता आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करत होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






