digital products downloads

राहुरी भाजपचा ‘अभेद्य गड”; 75 वर्षांत सर्वाधिक 75% मते‎: आठ वेळा आमदारकी भूषवलेल्या तनपुरे कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला खिंडार – Ahilyanagar News

राहुरी भाजपचा ‘अभेद्य गड”; 75 वर्षांत सर्वाधिक 75% मते‎:  आठ वेळा आमदारकी भूषवलेल्या तनपुरे कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला खिंडार – Ahilyanagar News



एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर तनपुरे कुटुंबाचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या या राहुरी मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निकालाने ७५ वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १ लाख ४० हजार ९३ मते मिळवत विक्रमी विजय नोंदवला. विशेष म्हणजे ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ७५ टक्के मतदान पडल्याची नोंद झाली आहे. राहुरी मतदारसंघाचे राजकारण कायमच तनपुरे कुटुंबीयांच्या भोवती फिरत राहिले. या कुटुंबाने तब्बल ८ वेळा आमदारकी भूषवली. मात्र, २००४ मध्ये भाजपने या गडाला पहिले खिंडार पाडले आणि तेव्हापासून समीकरणे बदलली. गेल्या २२ वर्षांच्या काळात तनपुरे कुटुंबाला २०१९ मध्ये केवळ एकदा आमदारकी मिळवता आली. १९५१ पासूनच्या प्रवासात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवाराला ७५ टक्क्यांचा एवढा प्रचंड जनादेश मिळाला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी १९५१ मध्ये मुंबई प्रांतात असलेल्या राहुरी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले लक्ष्मण माधवराव पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी ५९.३० टक्के मते मिळवली होती. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा निवडून आलेले लक्ष्मण माधवराव पाटील (अपक्ष) यांना ६०.३५ टक्के मते मिळाली. त्यानंतर १ मे १९६० मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले बाबुराव बापूजी तनपुरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना ५७.२९ टक्के मते मिळाली होती. स्व. कर्डिले यांच्या कामांमुळेच माझा विजय स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघात केलेली कामे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे माझा विजय झाला. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत मतदारसंघातील सर्वच मतदार माझ्या कुटुंबाप्रमाणे माझ्यासोबत राहिले, अशी प्रतिक्रिया नूतर आमदार अक्षय कर्डिले यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. मुद्द्याला बगल : नगर-मनमाड महामार्गाची चर्चा नाही राहुरीच्या राजकारणात आणि प्रचारात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या नगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा या पोटनिवडणुकीत मागे पडला. विकासाच्या या प्रमुख प्रश्नाऐवजी राजकीय गणिते, हिंदुत्व, भावनिक मुद्द्यांवर ही निवडणूक अधिक गाजली. अपक्षांच्या शर्यतीत “नोटा’ चा प्रभाव राहुरीच्या रिंगणात पाच अपक्ष उमेदवार नशीब आजमावत होते, त्यापैकी केवळ रावसाहेब खेवरे (७,२९९) आणि महेश हपासे (२,०५१) यांनी ‘नोटा’पेक्षा जास्त मते घेतली आहेत. उर्वरित दोन अपक्ष उमेदवार सूर्यभान लंबे (१,३६८) आणि अथर्व म्हसे (१,१४८) यांना ‘नोटा’च्या १,६३२ मतांचा आकडाही पार करता आला नाही. थोडक्यात, मतदारांनी या दोन अपक्षांपेक्षा ‘नोटा’ पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. कर्डिले पर्वाचा उदय २०२४ मध्ये स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना ५६.२% मते मिळाली होती, मात्र पोटनिवडणुकीत त्यांच्या पुत्राने थेट ७५टक्क्यांपर्यंत मजल मारली. १ लाख ४० हजार ९३ मते घेत अक्षय कर्डिले यांनी या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. आमदारकीची लॉटरी : २३ दिवसांत मिळाले यश अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही पोटनिवडणूक राजकीय लॉटरी ठरली. १ एप्रिल रोजी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर अवघ्या २३ दिवसांत, म्हणजेच २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या अल्प कालावधीत त्यांनी ७५ टक्क्यांचा ऐतिहासिक जनादेश मिळवला. “क्लीन चीट’ : मतदानाच्या पूर्वसंध्येला दोषमुक्ती निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने समीकरणे बदलली. विशेष म्हणजे, मतदानाच्या पूर्वसंध्येलाच त्यांना ईडीकडून “क्लीन चीट’ मिळाल्याने या पोटनिवडणुकीत मोठी राजकीय चर्चा रंगली होती. विराधेकांवर नामुष्की : सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले वगळता राष्ट्रवादी (श.प.) च्या गोविंद मोकाटे यांच्यासह इतर सर्व सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. नियमानुसार १६.६६% मते न मिळाल्याने ही नामुष्की ओढवली. दोन अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली. बुऱ्हाणनगरमध्ये अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा जल्लोष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष ठिकठिकाणी साजरा केला जात आहे. सोमवारी सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर गावात नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी गुलाल उधळला जात होता. तसेच ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात होते. या मिरवणुकीनंतर गावात चौकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अक्षय कर्डिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या यशाबद्दल नागरिकांचे आभारही मानले. मविआकडून दिग्गज नेत्यांनी फिरवली पाठ तनपुरे यांनी माघार घेतल्यावर महाविकास आघाडीने गोविंद मोकाटे यांना मैदानात उतरवले. मात्र, त्यांच्या प्रचाराकडे आघाडीच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले. केवळ खासदार निलेश लंके यांनीच प्रचार केला. तर इतर दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे मोकाटे यांची बाजू कमकुवत ठरली आणि मविआमधील विसंवाद चव्हाट्यावर आला. लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक राहुरीच्या या ऐतिहासिक विजयात महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरली आहे. महायुती सरकारच्या विविध जनहितार्थ योजना आणि विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने कर्डिलेंच्या बाजूने उभी राहिली. २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात महिलांचा वाढलेला टक्का आणि त्यांनी दिलेला एकतर्फी कौल यामुळेच अक्षय कर्डिले यांना ७५ टक्क्यांची विक्रमी मजल मारता आली आहे. यंदा निवडणुकीत गतवेळी पेक्षा १८ टक्के घट झाली होती. एकूण ५५. ८९ टक्के मतदान झाले होते. ८४ हजार महिलांनी मतदान केले होते. पोस्टल मतांचा कल टपाली मतदानामध्येही अक्षय कर्डिले यांनी बाजी मारली आहे. त्यांना २८३ टपाली मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना केवळ ५६ मते मिळाली. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मतदानाचा कलही पूर्णपणे सत्ताधारी भाजपच्या बाजूने असल्याचे यातून स्पष्ट होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp