
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर अखेर केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. या निवडीला गेल्या वर्षी झालेल्या राजकीय नाट्याची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यावेळी अध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विरोधात उभे राहण्याचे संकेत दिले होते. मात्र, ऐनवेळी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि अजित पवार यांची अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता अजित पवारांच्या पश्चात मोहोळ यांनी या संघटनेची संपूर्ण धुरा आपल्या हाती घेतली आहे. अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते. त्यांनी नुकतेच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून संघटनेत प्रवेश केल्याने त्यांच्या निवडीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून मोहोळ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे एका भीषण विमान अपघातात वयाच्या 66 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून निवडणूक प्रचारासाठी बारामतीला जात असताना झालेल्या या अपघातात त्यांच्यासह पाच जणांना प्राण गमवावे लागले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता आणि 29 जानेवारी रोजी बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या अनपेक्षित जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एका झंझावाती आणि प्रभावी युगाचा अंत झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






