digital products downloads

वाशिममध्ये चोरांचा हैदोस!: सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरात 17 लाखांचा ऐवज लंपास; तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांचा चोप – Akola News

वाशिममध्ये चोरांचा हैदोस!:  सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरात 17 लाखांचा ऐवज लंपास; तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांचा चोप – Akola News



वाशिम जिल्ह्यात आज चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, एका घटनेत चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरातून 17 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर दुसऱ्या घटनेत, बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका चिमुकल्याच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला सतर्क महिलांनी रंगेहाथ पकडले. या धाडसी महिलांनी चोरट्याचा डाव हाणून पाडत त्याला घटनास्थळीच चांगलाच चोप दिला. वाशिमच्या कारंजा शहरातील मेमन कॉलनी परिसरात एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरावर भरवस्तीत डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक जमील रहीम शेख यांच्या घराची कडी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील लॉकर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 17 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, चोरी सुरू असताना घरातील सदस्य शेजारच्याच खोलीत गाढ झोपेत होते, याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. एका पोलिस अधिकाऱ्याच्याच घरात अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तैनात करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीच्या घरीच चोरी झाल्याने या घटनेची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. महिलांनी दिला चोरट्यांना चोप वाशिमच्या मंगरुळपीर बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असताना, या गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने बसमध्ये चढणाऱ्या एका चिमुकल्याच्या हातातील कडे लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन सतर्क महिलांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांनी चोरट्याला जागेवरच पकडून चांगलाच चोप दिला, ज्यानंतर नागरिकांनी या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसी कृत्यामुळे महिलांचे कौतुक होत असले तरी, एवढ्या मोठ्या गर्दीच्या वेळी बस स्थानकावर एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp