
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील बेनोडा येथे एका 22 वर्षीय नराधमाने तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बाबू हसन असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. अत्याचारानंतर झालेल्या वादानंतर आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या आई व आजीला पाठवून घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पीडित तरुणी आणि आरोपी बाबू हसन यांची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या मैत्रीपूर्ण संवादादरम्यान पीडितेने तिचे काही फोटो आरोपीला पाठवले होते. दरम्यान, 5 जानेवारी रोजी आरोपी पीडितेची भेट घेण्यासाठी नागपुरात आला आणि तिथे त्याने पीडितेची इच्छा नसतानाही तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. काही दिवसांनी या दोघांमध्ये वाद झाल्याने पीडितेने आरोपीचा संपर्क क्रमांक ब्लॉक केला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने पीडितेचे जवळीक साधलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या आई तसेच आजीला पाठवून तिची बदनामी केली, शिवाय हे फोटो सर्वत्र व्हायरल करण्याची धमकीही दिली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचे दोन आणि पीडितेच्या आजीचा एक असे एकूण तीन मोबाईल जप्त केले असून, त्यामध्ये काही आक्षेपार्ह फोटो आढळले असले तरी अधिक तांत्रिक पुराव्यांसाठी हे सर्व मोबाईल न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तपासाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 (अ) वाढवले असून, अमरावती ग्रामीण पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कलमान्वये कारवाई केली आहे. दरम्यान, या घटनेबाबत समाजात कोणतीही चुकीची माहिती पसरू नये यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अधिकृत आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






