
कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्या पत्नी व मुलाला अत्यंत भयंकर पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचे काही फोटो आज समोर आलेत. त्यात पत्नी व मुलाच्या अंगावर मारहाणीचे काळे-निळे व्रण दिसून येत आहेत. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत मंत्र्यांच्या पंखाकाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का? राज्याच्या गृहमंत्र्यांनी व मंत्री सावे यांनी यावर मौन का बाळगले आहे? असा सवाल केला आहे. मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांनी मोबाईलमधील संशयास्पद चॅटची विचारणा केल्याप्रकरणी आपल्या पत्नी व मुलाला मारहाण केल्याची बाब मंगळवारी समोर आली होती. यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता या घटनेचे काही फोटो समोर आलेत. त्यात या दोघांनाही अत्यंत अमानुषपणे मारहाण झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे विजय कारंडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री अतुल सावे यांनी बाळगलेल्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच सावेंनी अद्याप या अधिकाऱ्याची हकालपट्टी का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न अन् मुलाला बॅटने फोडून काढले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले की, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचा ओएसडी विजय कारंडे याने आपल्याच पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. “मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही,” ही मस्ती येते कुठून? सत्तेच्या उबेत हे लोक इतके माजलेत की स्वतःच्या पोटच्या मुलालाही बॅटने फोडून काढताना त्यांचे हात थरथरले नाहीत. सत्तेचा वापर महिलांचे रक्षण करण्यासाठी करायचा की त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी? आपल्या पत्नीला आणि निष्पाप मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणारा हा नराधम मोकाट कसा? मंत्र्यांच्या पंखाखाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का? राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि मंत्री सावे यांनी यावर मौन का बाळगले आहे? मंत्री अतुल सावे, तुम्ही या अधिकाऱ्याला पदावरून हटवले की नाही? अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणे म्हणजे महिला अत्याचाराला खतपाणी घालणेच आहे. खरात प्रकरणात महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे सत्य बाहेर आले आहे,हे अधिकारी कायदा पायदळी तुडवतात आणि सत्तेच्या आडून संरक्षण मिळवतात,यांना वेळीच चाप बसला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. सुषमा अंधारेंची उपरोधिक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. हे लोक मागील आठवड्यात महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर मोर्चे काढत होते, असे त्या यासंबंधी उपरोधिकपणे म्हणाल्या आहेत. विजय कारंडेंचा पत्नीशी का झाला वाद? मंत्री सावेंचे ओएसडी विजय कारंडे यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईलमधील चॅटविषयी विचारणा करून पासवर्ड मागितल्याप्रकरणी कारंडे दाम्पत्यात वाद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी त्यांच्यात प्रथम शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर विजय कारंडे यांनी पत्नीचा गळा दाबून त्यांचा कथितपणे खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाहाही बॅटने भयंकर मारहाण केली. या प्रकरणामुळे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






