
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर थेट हल्लाबोल केला. कायद्याचा आधार न घेता सत्ता स्थापन करणे, पक्ष फोडणे, आमदार-खासदारांना वेगळे करणे आणि राज्यकारभार चालवणे सुरू असेल, तर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला तर त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार सरकारला नाही, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देत असले तरी आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मोर्चा घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजू शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या अडीच महिन्यांपासून आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत. मात्र राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नाही. मंत्रालयात शेतकरी संघटना आणि बागायतदारांची बैठक झाली, पण त्यातून ठोस निर्णय निघाला नाही, असा आरोप त्यांनी केला. विमा कंपन्यांच्या कठीण अटींमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच एनडीआरएफकडे मदतीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आला नसल्याचा आरोप करत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या बैठकीत माजी खासदार विनायक राऊत यांनीही सरकारवर टीका केली. कोकणातील शेतकरी आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्याऐवजी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार भाई जगताप यांनीही हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे म्हटले. पंचनाम्यांसाठी प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने अजूनही अनेक भागांतील पंचनामे पूर्ण झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






