
मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकलस्वाराची धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात घडला. बाजीराव कुमरे (वय ३२, राहणार बैतुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १७ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव कुमरे हे मोर्शीजवळील दुर्गवाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून आले होते. दुपारी तेथून ते आपल्या मूळ गावी बैतूलकडे परतत होते. पल्सर क्रमांक एमपी ४८-झेड एच ६७५४ या दुचाकीने प्रवास करत असताना, तहसील कार्यालयाजवळ अचानक त्यांचे संतुलन बिघडले आणि त्यांची दुचाकी थेट रोड दुभाजकावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. कान व नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांना रक्ताच्या उलट्याही झाल्या. घटनेची माहिती मिळताच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तानाजी युवा बहुउद्देशीय संघटना आणि टायगर ग्रुपच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे पाठवले. मात्र, अमरावती येथे पोहोचताच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या मदतकार्यात तानाजी युवा बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पंडागरे, टायगर ग्रुपचे आकाश चांदे, स्वप्नील फुके, अन्सार शेख, लवकेश धुर्वे, यश पांडे, तसेच मोर्शी पोलीस स्टेशनचे सौरभ धरमठोक, वागतकर, अजय गणबहाद्दूर, ऋषिकेश सहारे, अक्षय ढोले यांनी बाजीराव कुमरे यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






