
पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात राजकीय पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरोधात एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा सर्व प्रकार घडला आहे. आरोपी किशोर मासाळ याने पीडित महिलेशी असलेल्या जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे वेळोवेळी अश्लील मागण्या केल्या आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि मारहाण पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून तिला धमकावले. महिलेचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून तिची बदनामी करण्याची धमकी देऊन आर्थिक फायद्याची मागणी केल्याचाही गंभीर आरोप मासाळवर करण्यात आला आहे. केवळ धमकी देऊनच न थांबता, आरोपीने पीडितेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. नगरसेवकावर गुन्हा दाखल महिलेच्या तक्रारीनंतर बारामती पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेत नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यात प्रामुख्याने ‘कलम ७४, ७५, ७८ (विनयभंग आणि पाठलाग करणे), कलम ३३२(c) (अनधिकृत प्रवेश), कलम ११५(२), ३५२ आणि ३५१(२)(३) मारहाण आणि धमकावणे’ या कलमांचा समावेश आहे पोलिस कारवाईकडे लक्ष बारामती तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयित आरोपी नगरसेवकावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचे आरोप झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
