मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली: 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर – Mumbai News

मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली:  5 चिमुकल्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर – Mumbai News



राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने पाच निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), मुंबई अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. आता बचावकार्य पूर्ण झाले असून ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली दुर्घटना रविवारी (5 जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास मानखुर्दमधील हनुमान मंदिराजवळील जनता नगर परिसरातील चाळ क्रमांक 5 मध्ये ही दुर्घटना घडली. तळमजल्यासह तीन मजली कच्च्या बांधकामातील दोन ते तीन घरे क्षणार्धात कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकले. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 चिमुकले आणि एका महिलेचा मृत्यू डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेसह तीन लहान मुली आणि एका लहान मुलाला मृत घोषित करण्यात आले. तर राजावाडी रुग्णालयात आणखी एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एका तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पाहा घटनास्थळाचे फोटोज महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी आमदार अबू आझमी, रुक्साना सिद्दिकी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले – धोकादायक इमारतींची चौकशी केली जाईल राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. ते म्हणाले, या परिसरात अत्यंत अरुंद गल्ल्या असून 12 बाय 12 फुटांच्या घरांवर तीन-तीन मजले उभारण्यात आले आहेत. बहुतांश बांधकामे अनधिकृत स्वरूपाची असल्याचे दिसून येत आहे. धोकादायक इमारतींची सविस्तर चौकशी करण्यात येईल. नियमांनुसार मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : जखमींवर सर्वोत्तम उपचार करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबाबत सोशल मीडियावर शोक व्यक्त करत, एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केल्याची माहिती दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला असून गरज पडल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करून सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानखुर्द दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या दुर्घटनेनंतर सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा दिवसांत मुंबईत दहा नागरिकांचा विविध दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला असून, ही केवळ अपघातांची मालिका नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला. मानखुर्दमधील चाळ धोकादायक होती का? रहिवाशांना पूर्वसूचना देण्यात आली होती का? अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत. झाड कोसळणे, उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होणे आणि आता चाळ कोसळणे या घटनांमधून प्रशासनाने धडा घेत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत विविध दुर्घटना घडत आहेत. झाड कोसळणे, उघडे मॅनहोल, पाणी साचणे आणि आता मानखुर्दमधील चाळ कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp