
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित धमकीप्रकरणी कारवाईला गती मिळत नसल्याने प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने सदर खटला मागे घेण्याच्या सूचना दिल्याने, आता या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्या चौकशीला रीतसर परवानगी देऊनही पोलिसांनी अद्याप त्यांना चौकशीसाठी बोलावले नसल्याचा दावा प्रशांत आंबी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे केला असून, या संपूर्ण प्रक्रियेतील दिरंगाईबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांत असंतोष दर्शवला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेनंतर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातील शिवीगाळ आणि धमकीचा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला असून, येत्या दोन-तीन दिवसांत ते रीतसर खटला दाखल करणार आहेत. यापूर्वी गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी आंबी कुटुंबीयांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाचे आदेश असूनही गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नसल्याचा गंभीर आरोप आंबी यांनी केला आहे. पोलिस पीडितांऐवजी सत्ताधारी आणि आरोपींच्याच बाजूने उभे असल्याचे सांगत, ‘राज्यात गरीब व श्रीमंतांसाठी तसेच सत्ताधारी आणि सामान्यांसाठी वेगवेगळा न्याय आहे’, अशी खंत आंबी यांनी बोलून दाखवली. तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपला हा लढा असाच सुरू राहील, असा ठाम निर्धारही प्रशांत आंबी यांनी व्यक्त केला आहे. प्रशांत आंबी काय म्हणाले? प्रशांत आंबी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असे म्हटले की, ‘शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून मध्यरात्री मला फोन करून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, महामानवांच्या नावावरून शिवीगाळ, रोज 100 पुरुष घरी येतील अशी माझ्या कुटुंबाला बलात्काराची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात आम्ही रीटपिटीशन दाखल केली होती. ती आमच्या वकिलांना Withdraw करायचा सल्ला हायकोर्टाने दिलाय. आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल दखलपात्र गुन्हा नोंदवावा, एवढीच आमची मागणी होती. हायकोर्ट आमचा आवाज ऐकेल, असे वाटले होते. पण त्यांनी प्रक्रियावादी निर्णय दिला आहे’. पुढे प्रशांत आंबी म्हणाले, गायकवाड यांनी केलेल्या फोननंतर सुद्धा मला अनेक धमक्यांचे फोन आलेले होते. प्रशांत आंबीला पाकिस्तान-चीनमधून फंडिंग येते. त्याची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. तो नक्षलवादी आहे, राष्ट्रद्रोही आहे, विकृत प्रकाशक आहे, अशा पद्धतीची बदनामी आमदार गायकवाड आणि त्यांचे समर्थक करत आहेत. माझी चूक काय? तर मी फक्त अन्यायाविरोधात लढतोय. जिल्हा न्यायालयाने चौकशीची परवानगी देऊनसुद्धा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. लढाई सुरु राहील, असा निर्धार आंबी यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
