
राजकीय वर्तुळातून सायबर गुन्हेगारीची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एन. सी. यांचे अधिकृत व्हॉट्सॲप खाते हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी त्यांच्या संपर्कातील ओळखीच्या व्यक्तींकडून पैशांची मागणी करत तब्बल 3.92 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळेच ही फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप खुद्द शायना एन. सी. यांनी केला आहे. फसवणुकीची पद्धत- ‘थोडी मदत हवी आहे…’ सायबर भामट्यांनी शायना एन. सी. यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक केल्यानंतर अत्यंत चलाखीने त्यांच्या संपर्कातील लोकांना संदेश पाठवले. हॅकर्सनी संदेशात लिहिले, “मला थोडी मदत हवी आहे, तातडीने 49,000 रुपये पाठवा.” पैसे पाठवणाऱ्यांना हे पैसे अवघ्या दोन तासांत परत केले जातील, असा खोटा विश्वास देण्यात आला. या संदेशावर विश्वास ठेवून त्यांच्या संपर्कातील किमान 8 जणांनी प्रत्येकी 49,000 रुपये पाठवले. अशा प्रकारे अवघ्या काही तासांत हॅकरने 3 लाख 92 हजार रुपयांवर डल्ला मारला. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आणि संताप आपले खाते हॅक झाल्याचे आणि पैशांची मागणी होत असल्याचे लक्षात येताच, शायना एन. सी. यांच्या टीमने तातडीने पावले उचलली, मात्र पोलिसांच्या प्रतिसादावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी दुपारी बरोबर 1.58 वाजता पोलिसांकडे या संदर्भात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली होती. हॅकर्स ज्या ‘गुगल पे’ खात्यावर पैसे मागत होते, ते खाते तातडीने ब्लॉक करण्याची विनंती टीमने पोलिसांना केली होती. दिरंगाईचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती आणि ते खाते ब्लॉक केले असते, तर इतरांची आर्थिक फसवणूक निश्चितपणे टळली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया शायना एन. सी. यांनी दिली आहे. पोलीस केवळ ‘आम्ही खात्याचा शोध घेत आहोत आणि कारवाई सुरू आहे’ अशीच उत्तरे देत असल्याचा आरोप त्यांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार पोलिसांच्या या ढिसाळ आणि संथ कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने, शायना एन. सी. यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सध्या सायबर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे व्हीआयपी (VIP) व्यक्तींची सायबर सुरक्षा आणि पोलिसांच्या तत्परतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा… संभाजीनगर-इचलकरंजी बसला भीषण आग:चालकाच्या प्रसंगावधानामुळे 38 प्रवाशांची सुखरूप सुटका
छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि बाजूने जाणाऱ्या कारमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
