
तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याची संधी देण्यात येणार असून, यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही देण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी ता ३० दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक न्याय विभाग आणि सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तृतीयपंथीय संवेदनशीलता जनजागृती कार्यशाळे मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, पोलीस उपअधीक्षक डी. जी. केंद्रे, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सहउपाध्यक्षा डॉ. सान्वी जेटवाणी, रेखाताई देवकते, विनय खरटमोल आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयात दिव्यांगांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तृतीयपंथीयांना स्वावलंबी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज असून, समाजातील त्यांच्याविषयीची मानसिकता बदलण्यासाठी आरोग्य विभागामार्फत व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मार्गदर्शन करताना डॉ. सान्वी जेटवाणी यांनी तृतीयपंथीयांचा इतिहास, त्यांच्यासमोरील सामाजिक व आर्थिक समस्या, स्मशानभूमी व घरकुलासारखे मूलभूत प्रश्न यावर प्रकाश टाकला. तसेच तृतीयपंथीयांसाठी शासनाने लागू केलेल्या अधिनियमातील तरतुदींची माहिती देत समाजाची विचारधारा आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी कार्यशाळेची भूमिका विशद केली. या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, तृतीयपंथीय व्यक्ती, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/