
राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नवे बळ मिळाले आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाल्याचे सूचक विधान केले. नेमकं काय म्हणाले नाना पटोले? नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसकडून असा प्रस्ताव आधीपासूनच होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संविधानिक संस्थांना कमकुवत करण्याचे, संविधानाचे अवमूल्यन करण्याचे आणि देशाची संपत्ती विकण्याचे काम केले आहे, अशी भावना अनेक पक्षांमध्ये आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत येणे आवश्यक असल्याचे अनेक प्रादेशिक पक्षांना वाटत आहे.” ते पुढे म्हणाले, “ममता बॅनर्जी असोत, शरद पवार असोत किंवा इतर धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष असोत, देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र येण्याची भावना निर्माण झाली आहे. ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे.” पटोलेंच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांच्या व्यापक एकीकरणाबाबतच्या चर्चांना मोठी चालना मिळाली आहे. शरद पवार गटाने लगेच केला खुलासा मात्र, नाना पटोलेंच्या विधानानंतर शरद पवार गटाने अशा कोणत्याही विलीनीकरणाच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे काम करत आहे आणि पुढेही स्वतंत्र ओळख कायम ठेवेल.” त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार गटाने पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत म्हणाले- विलीनीकरणावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांसारख्या पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला दिला आहे. भाजपविरोधात एक मजबूत राष्ट्रीय पर्याय उभा करण्यासाठी काँग्रेसच्या मूळ विचारसरणीतून बाहेर पडलेल्या सर्व लहान पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षात विलीन झाले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विनंती केली आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेले सर्व छोटे पक्ष पुन्हा काँग्रेसच्या छत्राखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांच्या मते, आज देशातील विरोधी पक्षांना आपापल्या राज्यात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मदतीची आणि ताकदीची गरज आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि ममता बॅनर्जी यांना संकट काळात काँग्रेसची आठवण आल्याचे सांगत त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांनाही हाच मार्ग निवडण्याचा सल्ला दिला आहे. टीएमसीबाबतही चर्चा, पण अधिकृत भूमिका नाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी आणि काही खासदारांच्या राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर टीएमसीच्या भवितव्याबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसकडून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. विरोधकांच्या महाएकीकरणाची नवी सुरुवात? राजकीय विश्लेषकांच्या मते, नाना पटोले यांनी प्रत्यक्ष पक्षविलीनीकरणाचा दावा केलेला नसून भाजपविरोधी राजकीय एकजूट आणि काँग्रेसभोवती धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्याचा संदेश दिला आहे. लोकसभा निवडणूक 2029 आणि विविध राज्यांतील आगामी निवडणुका लक्षात घेता विरोधी पक्षांमध्ये मोठ्या राजकीय पुनर्रचनेच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत या विधानातून मिळत आहेत. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शरद पवार गट आणि काँग्रेसचे संबंध आणखी घट्ट होणार का? ममता बॅनर्जी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससोबत अधिक जवळीक साधणार का? भाजपविरोधी मतांचे विभाजन रोखण्यासाठी मोठे राजकीय आघाडीचे सूत्र तयार होत आहे का? तथापि, सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला असला, तरी नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांच्या महाएकीकरणाच्या चर्चांना नक्कीच नवे आयाम मिळाले आहेत. आगामी काळात या विषयावर शरद पवार, ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे देशाच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
