
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात एका शेतातील विहिरीत चक्क एक महाकाय मगर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सलग दोन दिवस चाललेल्या या थरारानंतर अखेर सोलापूर वनविभागाच्या पथकाने या मगरीला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विहिरीच्या कडेलाच बसली होती मगर कोरवली येथील बाबू दादा जमदाडे आणि संभाजी जमदाडे यांच्या शेतात ही धक्कादायक घटना घडली. शेतातील पाण्याचा विद्युत पंप बंद करण्यासाठी शेतकरी विहिरीजवळ गेले असता, त्यांना विहिरीच्या कडेला चक्क एक मोठी मगर दिसली. ही मगर विहिरीच्या बाहेर येण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, मात्र विहिरीची खोली आणि कडांमुळे तिला बाहेर पडणे शक्य होत नव्हते. मगरीला पाहताच शेतकऱ्याची भंबेरी उडाली. यानंतर जमदाडे कुटुंबीयांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. अंधारामुळे बचावकार्यात आला अडथळा माहिती मिळताच बुधवारी रात्रीच वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने कोरवली गावात घटनास्थळी दाखल झाली. मात्र, रात्र झाल्यामुळे आणि परिसरात प्रचंड अंधार असल्याने विहिरीतील मगरीला सुरक्षितपणे बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे आणि धोक्याचे होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. अखेर मगरीची सुखरूप सुटका दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी उजाडताच वनविभागाने सोलापूरच्या टीमच्या मदतीने पुन्हा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. अत्यंत शिताफीने आणि काळजीपूर्वक विहिरीत अडकलेल्या या महाकाय मगरीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. विहिरीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर, वनविभागाने या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे कोरवली गावात आणि पंचक्रोशीत मगरीचीच जोरदार चर्चा सुरू होती. हेही वाचा.. राज्यभरात 20 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार:13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, बळीराजाला दिलासा राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० जुलैपासून महाराष्ट्रातील विविध भागांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून, राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
