digital products downloads

नागपुरात पोलिसच असुरक्षित?: वरिष्ठांच्या मारहाणीनंतर सायबर सेलचा कर्मचारी 24 तासांपासून बेपत्ता! – Nagpur News

नागपुरात पोलिसच असुरक्षित?:  वरिष्ठांच्या मारहाणीनंतर सायबर सेलचा कर्मचारी 24 तासांपासून बेपत्ता! – Nagpur News



नागपूरच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये एका पोलसी कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस ठाण्यातील अत्यंत गोपनीय माहिती बाहेर कशी फुटली, या संशयावरून प्रफुल्ल ठाकरे नावाच्या कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, खात्यांतर्गत शिस्तीचा प्रश्न आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणातील सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे, मारहाणीच्या या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचारी प्रफुल्ल ठाकरे हे गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे पत्ता लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. पोलिस दलातच घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील कारवाईची गोपनीय माहिती पत्रकारांपर्यंत नेमकी कशी पोहोचली, या संशयावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल ठाकरे यांना विचारणा केली होती. या वादातून त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचा मोबाईलही हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. आपल्याला झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा न्याय मागण्यासाठी ठाकरे यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली होती. मात्र तिथेही दाद न मिळाल्याने ते व्यथित झाले होते. अखेर कालपासून ते बेपत्ता झाल्याने या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले असून, पोलिस दलातील अंतर्गत वादाचा हा प्रकार आता चर्चेचा विषय ठरत आहे. प्रफुल्ल ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी सायबर पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत, स्वतःच्या चुका लपवण्यासाठीच प्रफुल्ल यांचा छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. “आमच्या मुलाचा तातडीने शोध घ्या, त्याला काहीही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार असेल,” असा संतप्त सवाल उपस्थित करत कुटुंबीयांनी आपली भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, या वादाच्या केंद्रस्थानी असलेले पोलिस अधिकारी विजय राणे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला असला तरी, गोपनीय माहिती लीक झाल्याप्रकरणी प्रफुल्ल यांच्याकडे विचारणा केल्याची कबुली दिली आहे. मात्र, मारहाणीचे सर्व आरोप त्यांनी पूर्णतः फेटाळून लावले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पोलिस दलात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खुद्द पोलिसच पोलिस ठाण्यात असुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान, बेपत्ता प्रफुल्ल ठाकरे यांच्या वृद्ध माता-पित्यांनी वरिष्ठ पोलिस प्रशासनाला या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याचे साकडे घातले असून, आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी आर्त विनंती केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp