
निसर्ग संवर्धन केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवता आले पाहिजे. असे झाले तर गोड फळे मिळतातच. याचे जिवंत उदाहरण फुलंब्रीच्या श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात सापडते. माजी प्राचार्य तथा संस्थेचे विश्वस्त डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या पुढाकारातून लावलेल्या रोपट्यांचे आज विस्तीर्ण नंदनवनात रूपांतर झाले आहे. २२ गुंठ्यातील या परिसरात ७५३ विविध प्रकारची झाडे आहेत. विशेष म्हणजे, डॉ. ठोंबरे यांनी या बागेला तथागत गौतम बुद्धाचे जन्मस्थळ असलेल्या ‘लुंबिणी’चे नाव दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित या महाविद्यालयाने बाबासाहेबांचे विचारांचे तत्वत: पालन करण्याचा दृढनिश्चय केला आहे. वंचित, शोषित, श्रमिक, शेतकरी अन् शेतमजुरांच्या पाल्यांना ज्ञान देण्यासाठी १९९७ दरम्यान कॉलेज उभारले. राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी पंडित दीन दयाल शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. ठोंबरे कॉलेजचे प्राचार्य झाल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक सुधारणा, कॉपीमुक्त अभियानासह येथे सामाजिक न्यायाचा त्यांनी कैवार घेतला. पर्यावरण संवर्धनासाठी लुंबिनी उद्यानाच्या मध्यभागी बोधीवृक्ष लावले आहे. भोवताल फळांची झाडी आहे. या फळांचा गोडवा विद्यार्थ्यांना चाखण्यासाठी उद्यान खुले आहे. वृक्षांमध्ये सर्वाधिक सागाची ६२ झाडे आहेत. त्याखालोखाल सिताफळाची ३०, सिसम-२६, चिंच- २५, मोगऱ्याची ३० तर कडुनिंबाची ३५ झाडे आहेत. याशिवाय चंदन, आंबा, पेरू, जांभूळ, नारळ आणि बदामाची झाडेही डौलाने उभी आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






