
एकाच शाळेत शिकवणाऱ्या सहकाऱ्याने दुबईत नोकरी लावण्याचे व लग्नाचे आमिष दाखवून एका 43 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केला. धर्मांतर करण्यास भाग पाडले. परदेशात नोकरी करण्यासाठी धर्म बदलावा लागेल, असे सांगून आरोपीने पीडितेचे कथित धर्मांतर घडवून आणले. तसेच यूट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचे नाटक केले. महिलेकडून 3 लाख 41 हजार रुपये रोख आणि 6 तोळे सोने उकळले. आरोपी पसार झाला आहे. या प्रकरणी हुसेन अबू सोयदान (45,रा. कटकट गेट, नेहरूनगर, छ. संभाजीनगर) याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. जून 2024 मध्ये त्याच शाळेत शिकवणाऱ्या हुसेन सोयदान याच्याशी तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. लाखो रुपयांची उकळली रोख रक्कम दुबईला घेऊन जाण्याचे आश्वासन देणाऱ्या आरोपीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. जानेवारी ते एप्रिल या काळात महिलेकडून वेळोवेळी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात पैसे घेतले. वेदांतनगर आणि सिडको परिसरातील हॉटेलमध्ये बोलावून त्याने एकूण 3 लाख41 हजार रुपये उकळले. पासपोर्टच्या बहाण्याने सोने लाटले 20 एप्रिल रोजी आरोपीने महिलेला पुन्हा निराला बाजार येथील हॉटेलमध्ये नेले. परदेशात जाण्यासाठी आणि पासपोर्ट काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पदरमोड करावी लागेल, असे सांगून त्याने महिलेकडून विश्वासाने 6 तोळे सोने घेतले. तो निघून गेला. 25 एप्रिलपासून आरोपीने महिलेशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. लग्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर 1 जूनपासून त्याचा मोबाइल क्रमांकही बंद येत असल्याने आपली फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. ..तर मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये आरोपीने तिला दुबईत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तू मला आवडतेस. नवऱ्याला घटस्फोट दे. माझ्यासोबत राहा, अशी भुरळ घालून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. परदेशात नोकरी करायची असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल, अशी अटही त्याने घातली. त्यानंतर 4 जानेवारीला निराला बाजार परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने महिलेवर अत्याचार केला. यापूर्वीही महिलेने तक्रार दिली होती. मात्र, त्यावेळी आरोपीने समझोता केला होता. ठरल्याप्रमाणे तो न वागल्याने महिलेने आता नव्याने सविस्तर फिर्याद दिली आहे. मागील तक्रारीत धर्मांतराचा उल्लेख नव्हता. या गंभीर प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुबईला गेल्याची माहिती आहे. कथित धर्मांतर घडवून आणले एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला महिलेच्या पतीला या प्रकाराची माहिती मिळाली. महिलेला घर सोडावे लागले. यानंतर आरोपीने तिला गारखेडा परिसरात एकघर भाड्याने घेऊन दिले. तिथे संसारोपयोगी साहित्य आणण्यासाठी त्याने आणखी 50 हजार रुपये घेतले. 19 एप्रिल रोजी आरोपीने घरातच यूट्यूबवर मंगलाष्टके लावली. एकमेकांना माळा घालत लग्नाचा देखावा केला. मात्र,‘दुबईत नोकरीसाठी यायचे असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल”, असे सांगून त्याने महिलेला कलमा वाचण्यास भाग पाडले. कथित धर्मांतर घडवून आणले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
